ऊसाची उन्हाळ्यातील उशिरा लागण । घ्यावयाची काळजी । Precautions for Late planting of Sugarcane

ऊसाची उन्हाळ्यातील उशिरा लागण । घ्यावयाची काळजी । Precautions for Late planting of Sugarcane

फेब्रुवारी-मार्च महिन्यात केली जाणारी उसाची लागण ही 'सुरू' हंगामातील लागण मानली जाते. या काळात तापमान वाढू लागलेले असते, त्यामुळे जमिनीतील ओलावा लवकर कमी होतो. या उशिराच्या लागणीत जास्तीत जास्त फुटवा आणि जोमदार वाढ मिळवण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 

 

घ्यावयाची काळजी:-

१. योग्य वाणाची निवड:-

* उशिरा लागण करताना लवकर पक्व होणारे आणि उष्णतेला दाद देणारे वाण निवडावेत.

* शिफारस केलेले वाण: को. ८६०३२ (नीरा), को.व्ही.एस.आय. ०३१०२, को.एम. ०२६५ (फुले २६५).

*ऊस बेणेची निवड करताना ताज्या आणि रसरशीत बेण्याचा (१०-११ महिने वयाचा ऊस) वापर करावा.

२. बेणे प्रक्रिया (Seed Treatment):- 

* ऊसाची लागण करताना बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. 

* उन्हाळ्यामुळे उसाचे डोळे मरण्याची शक्यता असते, म्हणून बेणे प्रक्रिया चुकवू नका. 

* बुरशीनाशक: १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेंन्डाझिम मिसळून बेणे १० मिनिटे बुडवून ठेवावे. हे सुरुवातीच्या अवस्थेत रोगापासून संरक्षण करते. 

* कीटकनाशक: खोडकिडीच्या प्रतिबंधासाठी याच द्रावणात क्लोरोपायरीफॉस किंवा इमिडाक्लोप्रीड मिसळावे.

* जिवाणू संवर्धन: ॲसिटोबॅक्टर आणि पी.एस.बी. (स्फुरद विरघळवणारे जिवाणू) यांची प्रक्रिया केल्यास उगवण चांगली होते.

३. लागणीची पद्धत आणि अंतर:-

* दोन सऱ्यांमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. यामुळे उसाला भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो.

* कोरड्या पद्धतीने लागण करण्यापेक्षा ओल्या पद्धतीने (सरीमध्ये पाणी सोडून) लागण करणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यामुळे डोळे करपू नयेत म्हणून डोळा बाजूला किंवा वरच्या दिशेला राहील याची काळजी घ्यावी.

४. पाणी व्यवस्थापन:-

* फेब्रुवारी-मार्चमध्ये ऊन जास्त असल्यामुळे बाष्पीभवन जास्त होते त्यामुळे,

लागणीनंतरचे पहिले आणि दुसरे पाणी  वेळेवर द्यावे.

* जमिनीच्या प्रकार आणि गरजे प्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

* शक्य असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करावा, जेणेकरून पाण्याची बचत होईल आणि पिकाला सतत ओलावा मिळेल.

५. खत व्यवस्थापन:-

* उशिरा लागणीत सुरुवातीचा जोम महत्त्वाचा असतो.

* जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.

* लागणीच्या वेळी प्रति एकरी २ बॅग डीएपी (DAP), १ बॅग पोटॅश आणि २५ किलो गंधक (Sulphur) द्यावे.

६. खोडकिडीचे नियंत्रण:-

* वाढत्या तापमानामुळे या काळात खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

* लवकर येणाऱ्या खोडकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.

* यासाठी लागणीच्या वेळी जमिनीत फिप्रोनिल दाणेदार खतात मिसळून द्यावे.

* लागणीनंतर ४-५ आठवड्यांनी क्लोरँट्रानिलीप्रोलची आळवणी किंवा फवारणी करावी.

महत्त्वाचे:-

*उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सरीत उसाचे पाचट किंवा पालापाचोळ्याचे मल्चिंग (आच्छादन) केल्यास पाण्याचा ताण कमी बसतो आणि तणांचा प्रादुर्भावही कमी होतो.

Back to blog